वाशिम : ग्राम एरंडा येथील खून प्रकरणी ७ जणांना अटक | पुढारी

वाशिम : ग्राम एरंडा येथील खून प्रकरणी ७ जणांना अटक

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या मालकी हक्कावरील दिवाणी वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर बुधवारी (दि.११) ग्राम एरंडा येथील शेतकऱ्यास ठार मारण्यात आले होते. या प्रकरणातील एकूण ७ आरोपींना जऊळका पोलिसांनी अटक केली आहे.
जऊळका हद्दीतील ग्राम कार्ली शेत शिवारात असलेली गट क्र.३१४ मधील शेतजमिनीच्या मालकी हक्कावरून ग्राम एरंडा येथील रहिवाशी मृत गजानन उत्तम सपाटे व ग्राम कार्ली येथील रहिवाशी नारायण सखाराम डुकरे, मधुकर सखाराम डुकरे, किसन सखाराम डुकरे, नर्मदाबाई सखाराम डुकरे यांच्याशी दिवाणी स्वरूपाचा वाद न्यायालयात प्रलंबित होता.

बुधवारी सायंकाळी मृत गजानन सपाटे यांनी ग्राम कार्ली शेत शिवारातील शेतीतील सोयाबीन काढून ते कट्टे गावातील हनुमान मंदिराच्या पारावर ठेवले होते. सायंकाळच्या सुमारास छोटा हत्ती वाहन (MH-37-T-1670) ने ग्राम कार्ली येथील आरोपी तेथे आले. त्यांनी शेतीचा वाद उकरून काढत मृतास लोखंडी रॉड, लाठी-काठी व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. मृत रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला पाहून आरोपींनी छोटा हत्ती वाहना (MH-37-T-1670) मध्ये बसत तेथून पळ काढला.

या प्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून जऊळका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारणात आतापर्यंत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये ४ महिला व ३ पुरुषांचा समावेश आहे. न्यायालयाने महिला आरोपींना न्यायालयीन कोठडी तर पुरुष आरोपींना दि. १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button