

वर्धा : पुणे येथील विश्रांती नगर सिंहगड रोड येथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या गवा पुणे वनविभागाने आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्वरीत कार्यवाही करुन, बचाव केलेला होता. या गव्यास बोर व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे नैसर्गीक अधिवासात मुक्त करण्यात आले.
पुणे येथे विश्रांतीनगर सिंहगड रोड येथे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अडकलेल्या गवाचा सुरक्षित बचाव करण्यात आला. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने बेशुद्ध करण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यास कोणत्याही प्रकारची जखम अथवा मार नसल्याची खात्री करण्यात आली.
वैद्यकीय व वन्यजीव कायदयाच्या पदधतीनुसार तो नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी योग्य असल्याचे मत झाल्याने त्यास कोणत्या क्षेत्रात सोडावे याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश मागविण्यात आले. त्याप्रमाणे प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गवा बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे ठरले. समृद्धी महामार्गाव्दारे बोर व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात गवा आणण्यात आला. त्यास १ जुलै रोजी नवीन बोर क्षेत्रात सुरक्षितपणे निसर्गमुक्त करण्यात आले.
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या नैसर्गिक अधिवास हा गव्याच्या संवर्धनास अत्यंत योग्य असुन, दरवर्षी या संरक्षित क्षेत्रात एक गवा उन्हाळात मुक्कामास येत असतो व पाउस चालु झाल्यावर परत जात असतो. त्याच्या हालचालींवर व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी देखरेख ठेवत आहे. त्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी, न्यू बोर यांचे परीक्षेत्रात एक चमु तयार करण्यात आली आहे.
गवा पुणे येथून बचाव करण्यापासुन ते त्यास बोर व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्याच्या संपुर्ण प्रक्रीयेत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची भुमिका महत्वाची राहिली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात मुक्त करण्याबाबत मुख्य वनसंरक्षक पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर यांचे मार्गदर्शनात उपसंचालक बोर व्याघ्र प्रकल्प, सहाय्यक वनसंरक्षक कोअर ब वनपरीक्षेत्र अधिकारी, न्यू बोर व त्यांचे कर्मचारी यांनी महत्वाची कार्यवाही पार पाडली आहे. गवा प्राणी हा बोर व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गपर्यटकासाठी नवीन आकर्षण ठरणार आहे.