School Bus Accident: दैव बलवत्तर म्हणून ४२ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले; विहिरीच्या कठड्याला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला

भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकली.
School bus
School busPudhari
Published on
Updated on

फुरसुंगी: वडकी परिसरात बुधवारी (दि. १७) सायंकाळी घडलेल्या अपघातातून ४२ विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात बचावले. मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असताना पांडवनगर येथील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगत असलेल्या विहिरीच्या लोखंडी कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बस या कठड्याला अडकून राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात होती. त्यावेळी बसमध्ये ४२ विद्यार्थी होते. पांडवनगर येथील वळणावर ही बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या संरक्षण कठड्याला जाऊन धडकली.

School bus
Pune Smart Meter: स्मार्ट मीटरवरून गैरसमजाचा धुराळा; ग्राहक संघटनांचा विरोध कायम

या कठड्याला बस अडकल्याने ती विहिरीत कोसळण्यापासून वाचली; अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात घडताच बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. अनेक विद्यार्थी रडू लागले. बसमधील मदतनीस महिलेने प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना शांत केले आणि त्यांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने विद्यार्थ्यांना कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने पालक आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

School bus
Pune Crime: मैत्रिणीवरून वाद; मित्राने घेतला जीव

त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस सुरक्षितपणे बाजूला काढण्यात आली. मदतकार्यात पंडित मोडक, बाळासाहेब साबळे, ग्रामविकास अधिकारी माधव वाघ, महेश गायकवाड, नामदेव आंबेकर, सागर साबळे, अमित साबळे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्कूल बसची नियमित तपासणी, चालकांचे प्रशिक्षण, वाहनांचा वेग आणि सुरक्षाविषयक उपाययोजना याबाबत पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित शाळा प्रशासनाने या घटनेची चौकशी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत शाळेच्या प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

काही महिन्यांपूर्वी झाला होता चिमुरड्याचा मृत्यू

मोडक स्कूलच्या बसचा अपघात होण्याची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी उरुळी देवाची येथे बस रिव्हर्स घेताना एका पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी संबंधित चालकाकडे वैध वाहनचालक परवाना नसल्याचा आरोपही झाला होता. आता पुन्हा एकदा स्कूल बसचा अपघात झाल्याने शाळा प्रशासनाविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news