

वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटरमध्ये एका अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या हृदयशस्त्रक्रियेचा यशस्वी टप्पा गाठण्यात आला. 'लाखात एक' अशी स्थिती असलेल्या उजव्या बाजूच्या हृदयावर (डेक्स्ट्रोकार्डिया विथ सीट्स इन्व्हर्स) शस्त्रक्रिया करून ५१ वर्षीय महिलेला नवजीवन देण्यात तज्ज्ञ डॉक्टरांना यश मिळाले आहे.
आर्वी तालुक्यातील रसुलाबाद गावातील या रुग्णाला छातीत वेदना व थकवा जाणवत असल्यामुळे तिचा उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी दरम्यान तिच्या हृदयाची पंपिंग क्षमता (Ejection Fraction) केवळ ३५-४०% इतकी राहिली होती. हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे निदान झाले. तपासणीदरम्यान तिचे हृदय शरीराच्या उजव्या बाजूस असल्याचे तसेच इतर अवयव उलट्या क्रमाने असल्याचे स्पष्ट झाले, जी अत्यंत दुर्मिळ जन्मजात स्थिती आहे.
सामान्यतः डाव्या बाजूच्या हृदयावर शस्त्रक्रियेचा सराव असलेल्या डॉक्टरांसमोर हे एक मोठे तांत्रिक आव्हान होते. परंतु सुपरस्पेशालिटी सेंटरच्या डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने बीटिंग हार्ट बायपास सर्जरीद्वारे ही गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या पद्धतीत हृदय थांबवण्याऐवजी नैसर्गिक गती सुरू असतानाच सर्जरी केली जाते.
ही शस्त्रक्रिया ज्येष्ठ हृदयशल्यचिकित्सक डॉ. विवेक लांजे आणि डॉ. रंजना लांजेवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना डॉ. प्रसाद पानबुडे, डॉ. भक्ती पाटील यांच्यासह नर्सिंग व तंत्रज्ञ रथीश, अमोल, अर्चना, श्वेता, अंजली, मनीष खरे यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर सातव्या दिवशी तिला घरी सोडण्यात आले.
सावंगी येथील शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटर आता केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतात आधुनिक व दुर्मिळ उपचारपद्धतीसाठी प्रसिद्ध ठरत आहे. केवळ हृदयशस्त्रक्रिया नव्हे तर मेंदू विकार, कर्करोग, अस्थी व सांधेबदल, अवयव प्रत्यारोपण, यकृत व पचनसंस्थेचे आजार या सर्वातही आधुनिक यंत्रणांद्वारे दर्जेदार सेवा दिली जात आहे.
मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील रुग्णांनाही कमी खर्चात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी, हा आमचा उद्देश आहे आणि हे यश त्याचाच पुरावा आहे.