Menstrual Cup Benefits | मेन्स्ट्रुअल कप मासिक पाळीतील सुरक्षित पर्याय ? जाणून घ्या संपूर्ण माहिती
प्रत्येक प्रौढ स्त्रीला साधारणपणे वयाच्या पन्नाशीपर्यंत दर महिन्याला मासिक पाळी (पीरियड्स) येते. या काळात होणाऱ्या रक्तस्रावामुळे कपडे खराब होऊ नयेत म्हणून सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन्स आणि आता अधिक चर्चेत असलेले मेन्स्ट्रुअल कप वापरले जातात. आधुनिक महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल कप हा एक पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि सुरक्षित पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे.
मेन्स्ट्रुअल कप म्हणजे काय?
मेन्स्ट्रुअल कप हा वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनवलेला लवचिक फनेल आकाराचा कप असतो. हा कप योनीमध्ये ठेवून रक्तस्राव त्यामध्ये गोळा केला जातो. विशेष म्हणजे, एकच कप १० वर्षांपर्यंत पुन्हा पुन्हा वापरता येतो.
पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय
सॅनिटरी पॅड्सचे विघटन होण्यासाठी ५०० वर्षांहून अधिक काळ लागतो, तर मेन्स्ट्रुअल कप हे पुन्हा वापरता येण्याजोगे असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. त्यामुळे हा पर्यावरणप्रेमी स्त्रियांसाठी आदर्श पर्याय ठरतो.
आरामदायक आणि सुरक्षित
साधारणपणे एक मेन्स्ट्रुअल कप ८ तासांपर्यंत लीकेजपासून संरक्षण देतो. त्याउलट पॅड्स आणि टॅम्पोन्स दर ३-४ तासांनी बदलावे लागतात. कपमुळे कोणताही वास येत नाही आणि त्वचेचा त्रासही होत नाही.
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक
टॅम्पोन्स आणि पॅड्समध्ये वापरली जाणारी रसायने आणि सुगंधद्रव्ये योनीच्या नाजूक त्वचेला त्रास देऊ शकतात, तसेच पीएच बॅलन्सही बिघडवू शकतात. मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असल्यामुळे अशा प्रकारचा धोका राहत नाही.
आर्थिकदृष्ट्या किफायतशीर
एक मेन्स्ट्रुअल कप १० वर्षांपर्यंत वापरता येतो, त्यामुळे मासिक खर्चात मोठी बचत होते. दर महिन्याला सॅनिटरी पॅड्सच्या खर्चाच्या तुलनेत हा एकदा खरेदी करून दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे.
जास्त क्षमतेचे रक्तस्राव संचय
कपमध्ये १५ ते २५ मि.ली. पर्यंत रक्त साठवता येते, जे पॅड्स किंवा टॅम्पोन्सच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे वारंवार बदलण्याची गरज कमी होते आणि आरामदायी अनुभव मिळतो.
कोणता कप योग्य?
बाजारात आज विविध आकार, लवचिकता आणि ब्रँड्सचे कप उपलब्ध आहेत. तुमच्या शरीररचनेनुसार योग्य कप निवडण्यासाठी गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मेन्स्ट्रुअल कप हा एक सुरक्षित, आरामदायी, पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय आहे. मात्र कपचा योग्य वापर, स्वच्छता आणि योग्य निवड याकडे लक्ष दिल्यासच त्याचे संपूर्ण फायदे मिळू शकतात.

