

वर्धा : मे आणि जून महिन्यातिल नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेलाही बसला असून, वर्धा मंडळात केवळ मे आणि जून महिन्यात मिळून तब्बल ४० लाख ६९ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समजते. वादळामुळे अनेक ठिकाणी उच्चदाब व लघुदाब वीज खांब कोसळणे, वीजवाहिन्या तुटणे, वितरण रोहित्रे नादुरुस्त होणे आदी घटनांमुळे वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करून अनेक भागातील वीजपुरवठा पूर्ववत केला.
मे, जून महिन्यात जिल्ह्यातील विविध भागात वादळवार्याने हजेरी लावली. वादळवार्यात महातिवरणला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत खांब, विद्युत वाहिन्या, विद्युत रोहित्र आदींचे मे तसेच जून महिन्यात नुकसान झाले. वर्धा मंडळातील महावितरणला ४०.६९ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. महावितरणच्या अभियंते, अधिकारी आणि कर्मचार्यांनी प्रतिकूल हवामानातही दिवसरात्र मेहनत घेत नुकसानग्रस्त वीजयंत्रणा तातडीने दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
मे महिन्यातील वादळामुळे वर्धा मंडळात ३८ उच्चदाब वीज खांब कोसळले असून, त्यातून सुमारे २.३० लाख रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय १.८ किलोमीटर लघुदाब वीजवाहिन्या नुकसानग्रस्त झाल्या असून त्याची हानी २.६० लाख रुपये इतकी झाली. एक वितरण प्वाईंट देखील खराब झाल्याने सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. विविध प्रकारच्या नुकसानीसह मे महिन्यातील एकूण नुकसान ८.१० लाख झाल्याचे सांंगण्यात आले.
जून महिन्यात वादळांचा तडाखा अधिक तीव्र राहिल्याने नुकसानाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले. या महिन्यात १३४ उच्चदाब वीज खांब कोसळले असून त्यामुळे ११.९० लाख रुपयांचे नुकसान झाले. ३०९ लघुदाब वीज खांब पडल्याने १३.९९ लाख रुपयांची हानी झाली. याशिवाय १३.५६ किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनी नुकसानग्रस्त झाली असून त्याची हानी १.५० लाख रुपये इतकी आहे. १७.३४ किलोमीटर लघुदाब वीजवाहिनी तुटल्यामुळे २.९५ लाख रुपयांचे नुकसान झाले. वादळामुळे नऊ वितरण रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) नादुरुस्त झाल्याने आणखी २.२५ लाख रुपयांची हानी झाली. या सर्व प्रकारांमुळे जून महिन्यातील एकूण नुकसान ३२.५९ लाख रुपयांचे नुकसान महावितरणला सहन करावे लागले.