देवळी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

देवळी येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : रब्बी हंगामातील अतिवृष्टीमुळे आणि गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना पिक विम्याची नुकसान भरपाई त्वरित मिळावे. या मागणीसाठी देवळी तहसील कार्यालयासमोर युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांचे नेतृत्वात शेतकर्‍यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेऊन पिकविमा कंपनीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना आंदोलनस्थळी पाचारण केले. प्रथम किरण ठाकरे आणि पिकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र मोहले, दत्ता राहसे तसेच कृषी अधिकारी खोडे यांच्यामध्ये तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या कार्यालयामध्ये चर्चा झाली. त्यानंतर पिकविमा कंपनीचे सर्व अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी येत सर्व शेतकर्‍यांना रब्बीच्या पिकविम्याबाबत सविस्तर माहिती दिली.

देवळी तालुक्यातील 5287 शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा काढला होता. त्यापैकी 4811 शेतकर्‍यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या पार्श्वभुमीवर 3311 शेतकर्‍यांना 4 कोटी 28 लाख 95 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. उर्वरित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात येत्या दहा दिवसांत नुकसानभरपाई जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. जिल्ह्यातून सर्वात जास्त नुकसान भरपाई देवळी तालुक्याला मिळाली असल्याचे पिकविमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र मोहले यांनी उपस्थित शेतकर्‍यांना सांगितले. शेतकर्‍यांच्या मागण्यांची पूर्तता केल्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

किरण ठाकरे यांचे नेतृत्वात झालेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनात प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, अ‍ॅड. मंगेश घुंगरुड, नानाजी इंगोले, जोत्सना राऊत, समीर सारजे, राहुल पेटकर, संदीप दिघीकर, स्वप्नील मदनकर,अविनाश धुर्वे, मयूर ढुमने, रोशन भोयर आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news