वर्ध्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा | पुढारी

वर्ध्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा

वर्धा; पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांकरिता आज ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हा परिषदेसमोर आणण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांनी विविध घोषणा देत जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. मोर्चामध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मोठ्या संंख्येने सहभाग नोंदविला. अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, शासकीय वेतनश्रेणी व भत्ते देण्यात यावे, कर्मचार्‍यांना दरमहा पेंशन, आजारपणाची रजा, मिनी अंगणवाडी सेविका यांना मोठ्या अंगणवाडी सेविकाप्रमाणे मानधन, अंगणवाडी केंद्राचे भाडेवाढ, पुरक पोषण आहार रक्कम वाढ, चांगल्या दर्जाचे कार्यक्षम मोबाईल व दरमहा ३०० रुापये मोबाईल रिचार्ज, पोषण ट्रॅकर अ‍ॅप्स संपूर्ण मराठीमध्ये तसेच सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती लाभ द्यावा, यासह प्रधानमंत्री जिवनज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना तात्काळ देण्यात याव्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात दिलीप उटाणे, विजया पावडे, मंगला इंगोले, वंदना कोळणकर, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंभारे, सुरेखा रोहणकर, रेखा काचोळे, सुलभा तिरभाने, वंदना रेवतकर, अरुणा नागोसे, सिमा गढ़ीया, रंजना तांबेकर, सुनंदा आखाडे, माला भगत, विजया पावडे, हिरा बावणे, भैय्या देशकर, गुंफा कटारे, अर्चना मोकाशी, रंजिता मून, रंजना सावरकर, कल्पना गोडे, जया इंगोले, चित्रा भोंगाडे यांच्यासह अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

हेही वाचा : 

 

Back to top button