पिंपरी – चिंचवडमधील महिलांसाठीच्या बस गेल्या कुठे ? | पुढारी

पिंपरी - चिंचवडमधील महिलांसाठीच्या बस गेल्या कुठे ?

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बस प्रवासात महिलांची सुरक्षितता आणि त्यांना विशेष सोयीसुविधा देण्यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने खास महिलांसाठी पिंपरी-चिंचवडसह महिला विशेष बस सुरू केल्या होत्या. मात्र, शहरातील महिला या बससेवेचा कमी प्रमाणात लाभ घेत आहेत. परिणामी, याद्वारे कमी प्रमाणात नफा मिळत असल्याचे कारण दाखवत शहरातील काही मार्गातील या बसेस बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नफा महत्त्वाचा की महिलांची सुरक्षितता महत्त्वाची, असा प्रश्न महिलांमधून उपस्थित केला जात आहे. पिंपरी- चिंचवड शहर आणि परिसरात भोसरी आणि चाकण एमआयडीसी आणि हिंजवडी आयटी पार्क विकसित झाले आहे. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचार्‍यांची संख्या देखील तेवढीच आहे. यातील बहुतांश महिला कर्मचारी आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणार्या महिला कर्मचारी पीएमपीएमएल बसनेच प्रवास करतात. यामुळे पीएमपीएमएल बसमध्ये दररोज मोठी गर्दी असते.
विशेषत सकाळी आठ ते अकरा आणि रात्री पाच ते आठच्या दरम्यान प्रचंड गर्दी असते. यामुळे बसमधील विद्यार्थिनी यांच्यासह महिला प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुणे जिल्ह्यासह शहरात गर्दीच्या वेळी महिलांना बसमधून प्रवास करताना सामोरे जावे लागणार्‍या अडचणींचा विचार करून, पीएमपीएमएल प्रशासनाने महिलांकरिता 19 मार्गावर महिलांसाठी विशेष 24 तेजस्विनी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला होता, परंतु सध्या या बसेसने प्रवास करणार्या महिलांचे प्रमाण कमी असल्याचे कारण पुढे करीत, या बसेस बंद केल्याचे दिसून येत आहे. या बसेस पुन्हा सुरू करून महिलांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी महिलांतून होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात केवळ तीन महिला बस
सध्या निगडी-हिंजवडी, आकुर्डी रेल्वेस्टेशन-मनपा आणि चिखली-डांगे चौक या तीन बसेस शहरातील आकुर्डी, निगडी, भोसरी, हिंजवडी, माण फेज तीन, चिंचवडगाव, भोसरी, चिखली ते डांगे चौक या मार्गामधून महिला बस धावत होत्या. महिलांसाठी सुरू केलेल्या एकूण तीन बसपैकी केवळ निगडी ते हिंजवडी ही बस विशेष ठराविक वेळेत सुरू आहे. मात्र, एरव्ही या बसमधून इतरांना सेवा देण्यात येतात. यामुळे महिला विशेष बस आता महिलांनाच सेवा देत नसल्याचे दिसून येत आहे.

Back to top button