वर्धा : कृषी ग्राहकांच्या रोहीत्रांबाबत तक्रारींसाठी महावितरणची 24 तास हेल्पलाईन | पुढारी

वर्धा : कृषी ग्राहकांच्या रोहीत्रांबाबत तक्रारींसाठी महावितरणची 24 तास हेल्पलाईन

वर्धा , पुढारी वृत्तसेवा : तुमच्या परिसरातील वीजेचे रोहीत्र बंद असेल, रोहीत्रावरून योग्य दाबाचा वीजपुरवठा होत नसेल, रोहीत्र अतिभारीत असेल, अशा प्रकारे शेतक-यांना वीजेसंदर्भात कुठलीही अडचण असल्यास आता ती अडचण थेट महावितरणला तत्काळ कळविता येणार आहे, त्यासाठी महावितरणच्या वर्धा मंडळाने जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी 24 तास उपलब्ध असणारी हेल्पलाईन सुरु केली आहे. त्यामुळे आता वीज रोहीत्रासंबंधी कृषीपंपधारकांच्या अडचणींची सोडवणूक करणे शक्य होणार आहे.

वर्धा : 24 तास हेल्पलाईन उपलब्ध

महावितरणच्या वर्धा मंडळातील वर्धा, आर्वी आणि हिंगणघाट विभागातील  ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो.  महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी वर्धा येथे नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीच्या वेळी खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे आणि आ. समीर कुणावार यांनी वर्धा जिल्ह्यातील कृषीपंपधारक वीज ग्राहकांच्या रोहीत्राबाबत असलेल्या तक्रार नोंदणीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करण्याची सूचना केली होती. लोकप्रतिनिधींच्या सुचनांची गांभीर्याने दखल घेऊन महावितरणने शेतक-यांची गैरसोय टाळण्यासाठी 24 तास हेल्पलाईन उपलब्ध केली असल्याची माहिती महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
रोहीत्रासंबंधी तक्रार नोंदणीसाठी महावितरणने वर्धा जिल्ह्यासाठी कृषीपंपधारक वीज ग्राहकांसाठी 7875761100 ही हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहकांनी संबंधित क्रमांकावर फोन किंवा एसएमएस करुन तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन त्यांची समस्या सोडविण्यास महावितरणकडून प्राधान्य देण्यात येणार आहे.
हेही वाचा 

Back to top button