अमरावती : आंध्र प्रदेशातील मुचुमरी येथे आठ वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचे वय बारा आणि तेरा असून, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तेथील कालव्यात फेकून दिला असून, मृतदेह अद्यापही सापडलेला नाही.
मुलीच्या मृतदेहाची कालव्यात विल्हेवाट लावल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. मुचुमरी हे ठिकाण आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीपासून 300 कि.मी. अंतरावर आहे. तिसरीत शिकणारी पीडित मुलगी गेल्या रविवारपासून बेपत्ता होती. यामुळे तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यांनी पोलिसांना सांगितले होते की, मुलगी मुचुमरी पार्कमध्ये खेळत होती. मात्र, तिथून घरी परतलीच नाही.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. स्निफर डॉगची मदत घेतली असता आरोपी मुलांपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आले. आरोपींपैकी एकजण सहावीचा, तर दुसरे दोघे सातवीचे विद्यार्थी आहेत. पीडित मुलगी आणि हे विद्यार्थी एकाच शाळेत शिकत होते. तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याची कबुली आरोपींनी पोलिस चौकशीदरम्यान दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, जोपर्यंत मुलीचा मृतदेह मिळत नाही, तोपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार आहे. यासाठी ‘एसडीआरएफ’ची टीमही तैनात करण्यात आली आहे.
आरोपींनी पोलिसांना सांगितले की, आम्ही मुलीला उद्यानात खेळताना पाहिले होते आणि तिच्यासोबत खेळू लागलो. यानंतर तिला मुचुमरी धरणाजवळील निर्जन भागात नेले. तिच्यावर बलात्कार केला. मुलीने तिच्या पालकांना सांगितले तर अडचणीत येऊ शकतो, या भीतीने तिची हत्या केली आणि मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला.