भंडारा ; पुढारी वृत्तसेवा : आईला शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना घडली. क्षुल्लक वादातून वेळूच्या काठीने डोक्यावर प्रहार करीत मुलाने वडिलांचा खून केला. ही घटना पालांदूर पोलिस स्टेशन अंतर्गत खराशी येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली. आईच्या तक्रारीवरून मुलाला अटक करण्यात आली आहे.
बाबुराव गणा कहालकर (वय ६८) रा. खराशी, तालुका लाखनी असे मृताचे नाव असून, संशयीत आरोपीचे नाव मंगेश बाबुराव काहालकर (२८) असे आहे. घटनेची माहिती होताच पालांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.
बाबुराव कहालकर व मंगेश कहालकर यांच्यात नेहमीच दारूच्या नशेत वादंग व्हायचे. दोघेही दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात वाद-विवाद घालायचे. घटनेच्या दिवशी बाबुराव यांनी आपली पत्नी सुमन हिला शिवीगाळ केली. मंगेशच्या समोर आईला शिवीगाळ झाल्याने त्याला सहन झाले नाही. यातच त्याने बांबूच्या काठीने वडील बाबूराव कहालकर यांना मारहाण केली.
बांबूची काठी डोक्याला लागल्याने बाबुराव मृत्युमुखी पडले. त्यांना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मृत्युमुखी पडले. गावात घटनेची माहिती होताच घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी जमली. ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी संशयीत आरोपी मंगेश कहालकर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्ह्या नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.