शरद पवार म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. पक्ष महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव देणार आहे. काही नेते सोडून गेले त्यांची चिंता करू नका. आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.
मूल येथे तालुका क्रीडा संकुलामध्ये आयोजित कार्यकर्ता, शेतकरी आणि कामगार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रफुल्ल पटेल होते. मेळाव्यात ना. प्राजक्त तनपूरे, सुबोध मोहिते, मधुकर कुकडे मनोहर चंद्रकापूरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राजेंद्र जैन, अशोक जिवतोडे, शोभाताई पोटदूखे यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, तेल डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या वाढलेल्या किंमतीमुळे महागाईत वाढ झाली आहे. सामान्य जनता आणि शेतक-यांना याची मोठी झळ पोहचली आहे. वाढलेल्या किंमतीची जबाबदारी भाजपला टाळता येणार नाही, असे सांगून केंद्रातील सरकारला वाढत्या महागाईसाठी जबाबदार धरले आहे. ज्याच्या हातात पाच वर्षे राज्याची सत्ता होती, ते सत्ता गेल्यानंतर चुकीचे धोरण स्वीकारतात हे अमरावती पहायला मिळाले आहे, असा आरोप करून. सामाजिक ऐक्याला सुरूंग लावण्याचे जे काम करतात त्यांच्या हाती राज्य आणि देश जाता कामा नये, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.
ओबीसीची घटलेली टक्केवारी सुदधा छगन भूजबळ यांच्या नेतृत्वात काम करून पूर्ववत आणण्यात आली. आपल्या भाषणात त्यांनी मा. सा. कन्नमवार यांची आठवण काढली. गांधी नेहरू यांच्या विचारांना शक्ती देणारा चंद्रपूर जिल्हा असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका या जिल्हयाने बजावली. मात्र, आता चित्र बदलत असल्याचे सांगितले. मेळाव्यात राष्ट्रवादी सेवादल तर्फे शरद पवार यांना मानवंदना देण्यात आली.