नागपूर खंडपीठाकडून ‘मेडिकल रॅगिंग’ प्रकरणातील सहा विद्यार्थ्यांना दिलासा

नागपूर खंडपीठाकडून ‘मेडिकल रॅगिंग’ प्रकरणातील सहा विद्यार्थ्यांना दिलासा

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : मेडिकलमधील बहुचर्चित रॅगिंग प्रकरणी विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मेडिकलच्या रॅगिंग विरोधी समितीला सोपवला होता. त्यानुसार समितीने सर्वांना पुन्हा इंटर्नशिप बहाल केली. परंतु, त्यांच्यावरील वसतिगृहातील प्रतिबंध मात्र कायम ठेवले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

समितीच्या बैठकीत सहाही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे म्हणणे पुन्हा ऐकण्यात आले. त्यांच्याकडून पुढे अनुचित प्रकार घडणार नसल्याचे लेखी घेत इंटर्नशिप बहाल केली गेली. परंतु इंटर्नशिपवरून काढल्यापासूनच्या अतिरिक्त कालावधीसाठी त्यांना पुन्हा इंटर्नशिप करावी लागणार आहे. सगळ्यांवर वसतिगृहात प्रतिबंध मात्र कायम ठेवण्यात आला आहे. या भागात दिसल्यास कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

नागपूर मेडिकलमध्ये नोव्हेंबर २०२२ मध्ये रॅगिंगचे प्रकरण समोर आले होते. मेडिकलमध्येच इंटर्नशिप करीत असलेल्या सहा जणांनी मिळून 'एमबीबीएस'च्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्याची रॅगिंग घेतल्याचा व्हीडियो समोर आला होता. त्याच आधारे 'ॲण्टी रॅगिंग कमिटी'सह मेडिकल प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून मेडिकलच्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करून त्यांची वसतिगृहातूनही हकालपट्टी केली होती. दरम्यान, चित्रफीतीत न दिसणाऱ्या सहापैकी ३ विद्यार्थ्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रॅगिंग झाले नसल्याचेही लेखी दिले. परंतु. न्यायालयाने दोन्ही बाजू जाणून कारवाईचा निर्णय मेडिकलमधील रॅगिंग विरोधी समितीवर सोपवला होता.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news