चंद्रपूर : नागभिड तालुक्यात आढळला दुर्मिळ ‘काळा गरुड’

चंद्रपूर : नागभिड तालुक्यात आढळला दुर्मिळ ‘काळा गरुड’

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात नागभिड तालुक्यातील किटाळी (बोरमाळा) गावाला लागून असलेल्या गाव तलावाच्या पाळीवरील एका झाडावर मोठ्या आकाराचा देखणा व रुबाबदार पक्षी नुकताच आढळून आला आहे. या पक्षाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दुर्मिळपणे आढळणारा ' काळा गरुड ' असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'इक्टिनिट्स मलाइन्सिस' असे त्याचे शास्त्रीय नाव असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले आहे.

थंडीची चाहूल लागताच पक्षीप्रेमींची पाऊले मानवी हस्तक्षेप नसलेल्या पाणथळे अधिवासाकडे वळतात. पूर्व विदर्भातील नागभीड तालुक्यात घोडाझरीसारखा मोठा तलाव व इतर अनेक लहान तलाव आहेत. शिवाय डोंगर रांगांनी नैसर्गिक सृष्टी नटलेली आहे. या परिसरात दरवर्षी दिवाळीनंतर साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून स्तलांतरित पक्षांच्या आगमनाला सुरुवात होते. मागील काही वर्षांपासून नागभीड येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयातील पक्षीतज्ञ प्राणिशास्त्र विभागप्रमुख, डॉ. जी. डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनात पक्षांच्या विविध प्रजातींचा शास्त्रीय अभ्यास सुरु आहे.

९ जानेवारी २०२२ रोजी डॉ. जी. डी. देशमुख हे नेहमीप्रमाणे, पक्षीप्रेमी प्रा. निखिल बोरोडे, प्रा. अमोल रेवसकर व संजय सुरजुसे यांच्या समवेत पक्षीनिरीक्षणाला गेले हाेते. यावेळी किटाळी (बोरमाळा) गावाला लागून असलेल्या तलावाच्या पाळीवरील झाडावर मोठ्या आकाराचा देखणा व रुबाबदार पक्षी बसलेला दिसून आला. त्यानंतर त्या पक्ष्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. या पक्ष्याचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर पक्षाची ओळख पटलेली असून अतिशय दुर्मिळपणे आढळणारा ' भारतीय काळा गरुड', असल्याचे निष्पन्न झाले आहे. 'इक्टिनिट्स मलाइन्सिस' असे त्याचे शास्त्रीय नाव आहे.

हिमालय पर्वतरांगामध्ये नैसर्गिक अधिवास असलेल्या या गरुड पक्षाची महाराष्ट्रात व भारतात अतिशय तुरळक नोंदी वगळता अभावानेच नोंदी पाहायला मिळाल्या आहेत. या ऋतूमध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांवर बर्फाचा जाड थर साचतो व भक्ष्याचा अभाव जाणवायला लागतो. त्यामुळे खाद्याच्या शोधात राजस्थानच्या अरवली पर्वत रांगामध्ये 'काळा गरुड' पक्षी स्थलांतर करतो. तर मैदानी प्रदेशात याची नोंद अभावानेच होते, अशी माहिती शास्त्रीय लेखांचा अभ्यास केल्यावर मिळाली आहे.

भारतीय काळा गरुड संपूर्णतः रंगाने काळा असून, त्याची चोच तळाशी गडद पिवळा रंगाची असते. पाय गर्द पिवळ्या रंगाचे पायमोजे घातल्यासारखे दिसतात. भारतीय काळा गरुड शिकारी पक्षी असून, सरडे, साप, उंदीर, घुशी तर कधी वेळप्रसंगी इतर लहान पक्षांची शिकार करतो.

अलीकडच्या काळात निसर्गातील मानवाच्या अमर्यादित हस्तक्षेपामुळे हिवाळ्यातील अधिवासाला धोका पोहोचत असल्याने या अतिशय रुबाबदार गरुडाची संख्या रोडावत आहे. त्यामुळे निसर्गाचा असमतोल ढळून पिकांवरील रोगराईचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा शिकारी पक्षांच्या संवर्धनाकरिता प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, असे असे मत पक्षीतज्ज्ञ‍ डॉ. जी. डी. देशमुख यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news