उमरखेड : डॉ. धर्मकारे हत्‍या प्रकरणातील चौघा संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

उमरखेड : डॉ. धर्मकारे हत्‍या प्रकरणातील चौघा संशयितांना आठ दिवसांची पोलीस कोठडी

उमरखेड ; प्रशांत भागवत

बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्‍या हत्‍या प्रकरणी पोलिसांनी चाैघा संशयित आराेपींना ताब्यात घेतले असून, सूत्रधार अद्यापही फरार आहे. रविवारी चौघांना उमरखेड पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चाैघांना २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सै. तौसिफ सै. खलील, सै. मुश्ताक सै. खलील, शे. मोहसीन शे. कयूम आणि शे. शाहरुख शे. आलम सर्व रा. ढाणकी अशी चौघांची नावे आहेत. तर मुख्य मारेकरी शे. ऐफाज शे. अबरार (वय २२ रा . पुसद) हा अद्याप फरारच आहे. पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पुसद शहरातील शे. ऐफाज शे. अबरार या तरुणाच्या मोठ्या भावाचा उमरखेड शहरात अडीच वर्षापूर्वी ४ मे २०१९ रोजी अपघात झाला होता. या त्याच्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यावेळी संतप्त नातेवाइकांसह शेख ऐफाज शे. अबरार याने डॉ. धर्मकारे यांच्यासोबत हुज्जत घालून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

११ जानेवारी राेजी बालरोगतज्ज्ञ डॉ. धर्मकारे यांची रुग्णालय परिसरातील हॉटेलमधून बाहेर पडताना  गोळ्या झाडून हत्या करण्‍यात आली हाेती. या घटनेमुळे तब्बल तीन दिवस जिल्हाभरात आंदोलने चालली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिस  अधिक्षकांसह, अधिकाऱ्यांचा ताफा उमरखेड शहरात तळ ठोकून  होता. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत मारेकऱ्याला अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर होते. परंतु  घटनाक्रमाची सांगड घालीत एकापाठोपाठ एक क्लू पोलिसांना मिळत गेल्याने तब्बल चौथ्या दिवशी मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र  डॉ . धर्मकारे यांच्यावर गोळ्या झाडणारा मुख्य मारेकरी अद्याप फरारच आहे.

हे ही वाचा :

Back to top button