राजपथने मोडला कतार येथील विक्रम; ‘गिनीज बुक रेकॉर्ड’साठी उरले काही क्षण

राजपथ इन्फ्राकॉन
राजपथ इन्फ्राकॉन

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावर सार्वजनिक कार्य प्राधिकरण अश्गुल यांनी दोहा (कतार) येथे यापूर्वी केलेला विक्रम राजपथ इंफ्राकॉनने सोमवारी (दि. 6) मोडला. अमरावती-अकोला महामार्गावर बिटूमीनस कॉंक्रीटिकरणाचा विक्रम सुरु असून, चौथ्या दिवशी दुपारपर्यंत 26.90 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केला.

नागठाना गावापासून दुपारी 4.40 वाजता यू-टर्न घेण्यात आले. 6 जून 22 रोजी दुपारी 12 वाजता 25 किमीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर राजपथचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय शिवाजी जय भवानी घोषणा देत सर्वांनी आनंद व्यक्त केला.

विश्वविक्रमाचे उद्दिष्ट ठेवून सुरु केलेले हे आव्हानात्मक कार्य 7 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतमातेला काही देण्याच्या उद्देशाने राजपथ इन्फ्राकॉन प्रा. ली. तर्फे 108 तासात 75 किमी अखंड रस्त्यावर अखंड बिटूमीनस काँक्रीट पेविंगच्या श्रेणीत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे कार्य 3 जून 2022 रोजी सकाळी 7.27 मिनीटांनी सुरू झाले. सोमवारी (दि. 6) दुपारी 12 वाजता 25.275 किमीचा टप्पा पूर्ण करण्यात आला. विशेष म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या दिवशी हा विक्रम झाल्याने राजपथच्या सर्व सेवकांच्या चेहर्यावर मोठा आनंद दिसून आला.

असे मोडले विक्रम

यापूर्वी राजपथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान पुसेगाव ते म्हासूर्णे दरम्यान 24 तासात रस्ता तयार करत विक्रम स्थापित केला होता. जागतिक स्तरावर सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा (कतार) येथे यापूर्वी विश्वविक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवसांच्या नॉनस्टॉप बांधकाम करून 25 किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला. हे लक्ष्य राजपथ इन्फ्राकॉनने 3 दिवस 5 तासात यशस्वीरीत्या पूर्ण केले. ही आव्हानात्मक कामगिरी 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनेल, असा विश्वासही राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी व्यक्त केला. हा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' देशाला समर्पित करणार असल्याचे राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news