

नागपूर : नागपुरात बिबट्याने मानवी वस्तीत घुसून बुधवारी केलेल्या हल्ल्यानंतर विधानभवन परिसरातही बिबट्या लक्षवेधी ठरला. शिवसेना सदस्य शरद सोनवणे यांनी बिबट्यासारखाच पेहराव करीत राज्यातील बिबट्यांचे वाढते हल्ले आणि मृत्यूच्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले. सभागृहात येताच अध्यक्षांनी त्यांना समज दिली.
वन्यजीवप्रेमींनी राज्य सरकारकडे तत्काळ ‘आपत्कालीन’ स्थिती जाहीर करण्याची आणि बचाव केंद्रे (रेस्क्यू सेंटर्स) उभारण्याची मागणी केली आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अवघ्या तीन महिन्यांत 55 लोकांचा मृत्यू झाला. बिबट्यांवर शासनाने सुमारे 17.50 कोटी रुपये खर्च केल्याची नोंद आहे; मात्र तरीही मानवी मृत्यू थांबलेले नाहीत. बिबट्यांच्या उपद्रवामुळे ‘राज्य आपत्कालीन’ (स्टेट क्रायसिस) स्थिती घोषित करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. फक्त नागपूरच नाही तर पुणे, धुळे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी भागांमध्येही बिबट्यांची समस्या वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना, तसेच वनमंत्र्यांना भेटण्याची आणि हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची भूमिका माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.