Himayatnagar leopard attack
हिमायतनगर : तालुक्यातील धानोरा शिवारात बिबट्याने एका रोई प्राण्यावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली. गेल्या आठवड्याभरापासून बिबट्या या भागात फिरताना दिसत असल्याने धानोरा, वारंगटाकळी परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
शिवारात सतत बिबट्याची वर्दळ असल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काहींनी शेतीकामाकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी एका शेतकऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर पुन्हा प्राण्यावर हल्ला झाल्याने परिसरात अधिकच दहशत निर्माण झाली आहे. धानोरा, बोरगडी, सिबदरा, कारला, वारंगटाकळी, मगरुळ, खैरगाव व वडगाव परिसरात बिबट्याच्या उपस्थितीबाबत सतत चर्चा सुरू असून ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.
बुधवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत प्राण्याचा दफनविधी केला. विभागाने बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून दररोज वेगवेगळ्या गावात त्याचे दर्शन होत असल्याने वन विभागही गोंधळलेला आहे. स्थानिकांच्या मते, बिबट्याच्या हालचालींचा वेग वाढल्याने हिमायतनगर तालुक्यात भीतीचे सावट आणखी दाटले आहे.