

Two killed, two seriously injured in massive fire in Mahal Gandhigate area
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
नागपूर महाल गांधी गेट परिसरातील जयकमल कॉम्प्लेक्समध्ये आर के लाईट हाऊसच्या गोदामात (शनिवार) रात्री भीषण आग लागली. मध्यरात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला, तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या गोदामामध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचे बोलले जात आहे. गोदामाचे मालक गिरीश खत्री (वय 35) त्यांचा नोकर विठ्ठल धोटे (25) यांचा मृत्यू झाला. वेल्डिंग काम करणारा गुणवंत दिनकर नागपूरकर (45) आणि ऐश्वर्या लक्ष्मीकांत त्रिवेदी (34) गंभीर जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच मनपा अग्निशमन विभाग गंजीपेठ, गणेशपेठ, सक्करदरा, सिव्हिल लाईन्स अशा सुमारे सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. प्राथमिक माहितीनुसार वर्दळीचा भाग असलेल्या या चार मजली इमारतीत तळमजल्यावर खात्री यांच्या मालकीचे लग्नासाठी वापरण्यात येणारे लाईट आणि फटाक्यांचे दुकान आहे.
पहिल्या माळ्यावरील फ्लॅट क्रमांक 110 येथे गोदाम आहे. या गोदामातच वेल्डिंचे काम सुरू होते. गोदामामध्ये फटाके, शोभेच्या वस्तू व कापड असे इतर साहित्य असल्याने लगेच आगीने रौद्र रूप धारण केले. धूर निघताना दिसत असल्याचे समजताच नागरिकांनी पोलीस, अग्निशमन दलाला माहिती दिली. कोतवाली पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या इमारतीत असलेल्या गोडाऊनबद्दल अनेक दिवसांपासून लोकांच्या तक्रारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.