

नागपूर : लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटा कॉलनी मार्गावर शनिवारी (दि.१४) दुपारी एका रिक्षा चालकावर त्याच्याच मित्रांनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रिक्षा चालकावर निलेश नगराळे हा गंभीर जखमी झाला आहे. तो जखमी अवस्थेतच स्वतः रिक्षा चालवत लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचला, जिथे पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, मित्रांनीच हा जीवघेणा हल्ला का केला, याचे गूढ अद्याप कायम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ही घटना घडली. निलेश नगराळे याच्यावर त्याच्या काही मित्रांनी अज्ञात कारणावरून चाकूने हल्ला चढवला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतरही निलेशने धाडस दाखवत स्वत: रिक्षा चालवत तो थेट लकडगंज पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी पोलीस ठाण्यात इतर कामांमुळे किंवा वाहनाच्या उपलब्धतेअभावी रुग्णवाहिकेची वाट न पाहता, पोलिसांनी प्रसंगावधान राखत निलेशला त्याच्याच रिक्षामधून तातडीने मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्यासोबत पाठवण्यात आले.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, दारू पाजली नाही या क्षुल्लक कारणावरून किंवा काही आर्थिक देवाणघेवाणीतून हा हल्ला झाला असावा, अशी चर्चा आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपी मित्रांचा शोध सुरू आहे.
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी परिसरात भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरू होते. अशा वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या भागातील पोलीस ठाण्यात जखमीला तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध नसल्याने काही काळ आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र, पोलिसांनी उपलब्ध परिस्थितीत जखमीला वेळेत मदत पोहोचवल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणाच्या तपासातून हल्ल्यामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.