

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सुरक्षा रक्षकाची मध्यरात्रीच्या सुमारास निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अब्दुल असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून, या हत्येमुळे परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. आरोपी कारमधून पसार झाले असून, त्यांच्या अटकेनंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अब्दुल हे एका कबाडीच्या दुकानात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. काही अज्ञात इसम एका कारमधून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अब्दुल यांची हत्या केली. हत्येनंतर सर्व आरोपी त्याच कारमधून घटनास्थळावरून पसार झाले.
ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली की कोणत्या जुन्या वैमनस्यातून, याबाबत सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत. नंदनवन पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्याआधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नंदनवन परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.