

Chandrashekhar Bawankule on Raj Thackeray Uddhav Thackeray
नागपूर : मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विकास हेच मुद्दे चालणार आहेत. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवत राज ठाकरे व उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मुंबईची दिशा कळत नसल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.१२) माध्यमांशी बोलताना केली.
राज ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री फडणवीस हिंदू आहेत का?’ या केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. विकासाचा अजेंडा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत आहे. आतापर्यंत अशा पद्धतीने मतदान मागितले गेले; मात्र आता विकासावरच मतदान मागावे लागणार आहे. खरेतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याइतका“मी मोठा नाही; पण त्यांच्या पक्षाची अधोगती होत आहे, याचे कारण प्रचाराची चुकीची दिशा आणि घेतलेले निर्णय आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ‘मुंबई तोडणार’ अशा वक्तव्यांवर बोलताना अशा विधानांना आता कोणीही गांभीर्याने घेणार नाही,.
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, अडीच वर्षे जनतेने दोघांनाही पाहिले आहे; त्यावर न बोललेलेच बरे. “सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासाबद्दल बोलू शकत नाहीत,”अशी टीका त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्या मिमिक्री व वक्तव्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला. “महाराष्ट्र आणि मुंबई कुठे चालली आहे, याची दिशा त्यांना कळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुलना करण्याइतकी क्षमता आहे का आणि हे जनतेला मान्य आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने वेळ का मागितली, याची सविस्तर माहिती माझ्याकडे नाही. मात्र फेब्रुवारीत दहावी-बारावीच्या परीक्षा, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका, बजेट सत्र आणि निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन यामुळे आयोगाला काहीसा वेळ लागत असावा, असे बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाचा तिढा हा विषय असून सरकारची बाजू न्यायालयात मांडली जाईल. यासंदर्भात न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘लाडकी बहीण’ योजनेवर काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस पक्ष नेहमीच या योजनेच्या विरोधात राहिला आहे. ज्या ठिकाणी काँग्रेसची सरकारे आहेत, तेथे ही योजना बंद झाली; न्यायालयात त्यांना धक्का बसला. आता मकरसंक्रांतीला लाभार्थींना पैसे मिळत असतानाही त्यांचा विरोध आहे. “काँग्रेसचे रक्त महिलाविरोधी आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.ही योजना आजची नाही; नियमितपणे सुरू असलेली योजना असल्याने आचारसंहितेचा भंग होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग ही योजना बंद करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात सर्वत्र भाजपला यश मिळेल, तर काँग्रेसची ताकद कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे अमरावतीत भाजपची युती तुटली. युवा स्वाभिमानी संघटनेच्या विरोधात स्थानिक नेत्यांनी परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतला आहे. युतीनंतरही अधिक उमेदवार उभे राहिल्याने काही भूमिका घ्याव्या लागल्या यावर भर दिला.