

Chandrapur Municipal Council Election
चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेना महायुतीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक चंद्रपूर येथे पार पडली. या बैठकीला महसूल मंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व प्रमुख नेते, निवडणूक प्रभारी आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती, ४ जानेवारी रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोड शोचे नियोजन आणि पक्षातील अंतर्गत वादांवरील समन्वय या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रपूर येथील बैठकीत भाजप व शिवसेना पक्षाचे महायुतीतील सर्व उमेदवार सहभागी झाले होते. महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी कोणती निवडणूक रणनीती राबवावी, मतदारांपर्यंत विकासाचा अजेंडा प्रभावीपणे कसा पोहचवावा, यावर नेत्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, “चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही ५१ टक्के मतदान मिळवून दोन तृतीयांश बहुमताने जिंकणार आहोत. २०२९ पर्यंत चंद्रपूरचे सर्व मूलभूत प्रश्न सोडवून विकसित चंद्रपूर निर्माण करू.”
पालिकेच्या निवडणुकीसाठी काही उमेदवार बदलण्यात आले होते. त्या सर्वांशी आपण प्रत्यक्ष भेट घेतल्याचे सांगत मंत्री बावनकुळे म्हणाले, “बदललेल्या उमेदवारांशी माझे बोलणे झाले आहे. भविष्यकाळात योग्य सन्मान आणि जबाबदारी त्यांना दिली जाईल. आता पक्षात कुठलेही मनभेद–मतभेद नाहीत. सर्व नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढतील.”
भाजपचे महानगर अध्यक्ष पदावरून कमी करण्याच्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “काही गैरसमज झाले होते, ते दूर करण्यात आले. आता अध्यक्षपदावरून कमी करण्यात आले आहे. हीच मोठी कारवाई असून, पक्षात आता कुठलाही वाद शिल्लक नाही.”
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्या (४ जानेवारी) होणाऱ्या रोड शो संदर्भातही सविस्तर नियोजन करण्यात आले. रोड शोचा मार्ग, गर्दी व्यवस्थापन, प्रचार संदेश, महायुती नेत्यांचा सहभाग आणि कार्यकर्त्यांचे नियोजन यावर अंतिम रूपरेषा ठरवण्यात आली.
चंद्रपूर महापालिकेतील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी “दुपारी ३ नंतर दबाव टाकून उमेदवारांना बिनविरोध करण्यात आले,” असा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “संजय राऊत हे कायम निगेटिव्ह भूमिका घेतात. बिनविरोध निवड ही पूर्णपणे विकासाच्या अजेंड्यावर आणि सामंजस्याने झाली आहे. यात कुठलाही दबाव नाही.”
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील समन्वयाबाबत विचारले असता मंत्री बावनकुळे यांनी खेळीमेळीच्या भाषेत विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “दोघांमध्ये आता उत्तम समन्वय आहे. हे दोन्ही फलंदाज चौके–छक्के मारून निवडणूक जिंकतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
महायुतीच्या या बैठकीने चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अधिक धार दिली असून, अंतर्गत वाद मिटल्याच्या दाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शोमुळे प्रचाराचा पुढील टप्पा अधिक प्रभावी होईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे.