

नागपूर : अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत नागपुरातील वर्धमानगर क्रेटा कॉलनी येथील उद्योजक पारस कामदार यांच्या कुटुंबातील यशा कामदार हिच्यासह तिघे मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. काशिश कामदार यांनी या वृत्ताबाबत दुजोरा दिला असून कुटुंबीय या घटनेनंतर समृद्धी महामार्गाने अहमदाबादकडे रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अहमदाबाद येथील मेघानी भागात गुरुवारी (दि. १२) एअर इंडियाचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत नागपूर येथील उद्योजक पारस कामदार यांच्या कुटुंबातील यशा कामदार हिच्यासह तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये दीड वर्षीय रुद्र कामदार आणि त्यांची सासू रक्षा मोढा यांचाही समावेश आहे. रक्षा यांच्या पतीचे निधन नुकतेच झाले. लंडन येथे २२ जून रोजी आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी हे तिघे लंडनला जात होते, अशी माहिती आहे. मात्र, मृतांची यादी येईपर्यंत यासंदर्भात दिवसभर कुणीही अधिकृतपणे बोलण्यास तयार नव्हते.