नागपूर : भारतीय सीमा ओलांडून मुलाला एकटे ठेवून पाकिस्तानात गेलेली नागपुरातील कपिल नगर येथील सुनीता जामगडे उर्फ अनिताची आज सोमवारी पोलिस कोठडी संपल्याने तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी मिळाल्याने मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.
2 जूनपर्यंत ती पोलिस कोठडीत होती. आज तिचा मुलगा देखील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कारगिल बालक कल्याण समितीच्या ताब्यातून नागपुरात परतला. मात्र, या दोघांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने पोलिसांचा तिच्यावर हेरगिरीचा संशय कायम आहे. धर्मगुरूने या महिलेला तिकडे बोलावले म्हणून ती यापूर्वी देखील पाकिस्तानात गेली आहे. यामागचे नेमके गूढ काय हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे.
महिलेने आपल्याला पाकिस्तान बघायचे होते म्हणून गेल्याची बतावणी केली असली तरी पोलिसांचा तिच्यावर हेरगिरी करण्याचा संशय कायम आहे. नागपूर पोलीस अमृतसर येथून तिला घेऊन गुरुवारी शहरात आले. विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली. मात्र सुनिता केवळ झुल्फिकार व एका धर्मगुरूच्या संपर्कात होती ती इतरही कोणाच्या संपर्कात होती याचा शोध पोलीस घेत आहेत. मोबाईल जप्त केला असला तरी डाटा सायबर पोलिसांना शोधण्याचे आव्हान आहे कारण तो डिलीट झालेला आहे. कधी आपण मनी खरेदीसाठी गेलो तर कधी हॉस्पिटलमध्ये काम करायचे होते तर कधी पाकिस्तान बघायचे होते अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या चौकशीत सुनीता लढवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.