

Pakistan Border Crossing Nagpur Sunita Jamgade Police Custody
नागपूर : भारत- पाकिस्तान तणावपूर्ण वातावरणात मध्यंतरी सीमा ओलांडून थेट पाकिस्तानात गेलेली नागपुरातील कपिल नगर येथील 42 वर्षीय सुनीता जामगडे उर्फ अनिता नामक महिला अखेर अमृतसर एक्स्प्रेसने नागपुरात परतली. कपिल नगर पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करीत तिला अटक झाली. न्यायालयाने तिला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सुनिताची शहर पोलिस, गुप्तचर यंत्रणा, सीमा सुरक्षा दल व दहशतवाद विरोधी पथकामार्फत कसून चौकशी सुरू आहे. बर्फाळ प्रदेशातून ती सीमा रेषा ओलांडून कशी गेली, तिने हेरगिरी केली का? हे अजून गुलदस्त्यात आहे. सुनीता पाकमधील जुल्फिकार व एका धर्मगुरूंच्या संपर्कात होती. पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता डाटा डिलीट करण्यात आल्याचे पुढे आले. सायबर पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत. मी मनी खरेदीसाठी गेली अशी बतावणी ती करीत आहे. 23 मेरोजी तिला वाघा बॉर्डरवर सीमा सुरक्षा दलाच्या स्वाधीन करण्यात आले.
सुनीताचा 12 वर्षीय मुलगा उद्या शुक्रवारी नागपुरात येणार आहे. 14 मे रोजी ती सीमा ओलांडत असताना तिला ताब्यात घेण्यात आले. चौकशी करण्यात आल्यावर पाक रेंजर्सकडून बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाकडे तिला सोपविण्यात आले. तिला ताब्यात घेण्यासाठी कपिल नगर पोलिस स्टेशनचे एक पोलिस अधिकारी आणि चार पोलिस असे पथक अमृतसरला रवाना झाले होते. पोलिस उपायुक्त निकेतन कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस तपास करीत आहेत. तिची आई नागपुरातील कपिल नगरात चिंतेत होती. यापूर्वी देखील ती अशीच न सांगता बेपत्ता झाली. ती थोडी विमनस्क असून उपचारही सुरू असल्याचे तिच्या आईने माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, मुलाला एकटे सोडून मी लवकर येतो, असे सांगून तिने कारगिल सीमाभागातील हंदरमन येथून एलओसी ओलांडली. बराच उशीर झाला तरी ती न परतल्याने स्थानिकांनी लडाख पोलिसांना कळविले आणि मुलाला त्यांच्याकडे सुपूर्द केले.