नागपूर: पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्यावर आरोप करणारे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि.१५) त्यांची घेतलेली भेट राजकिय वर्तुळात चर्चिली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी या भेटीत गैर नाही, असे म्हटले आहे.
आत्राम म्हणाले की, छगन भुजबळ, मी अथवा इतरही आमच्यातल्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत गेली अनेक वर्षे एकत्रित काम केले आहे. मुळात शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून ते मराठा आहेत. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी भेट घेण्यात काही अडचण नाही. या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नाही. राज्यात ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजात आरक्षण संदर्भात तिढा वाढत आहे. हा प्रकार नक्कीच योग्य नाही. राज्यात शांतता रहावी म्हणून या दोन्ही नेत्यांनी चर्चा केली असल्यास ते नक्कीच चांगले आहे.
महाराष्ट्रात सर्वच जाती- धर्म, पंथाचे लोक एकत्र आनंदाने राहतात. यापुढेही ही स्थिती रहायला हवी. नुकतीच विधान परिषदेची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांनी दिलेले २ उमेदवार निवडून आणले. प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३९ आणि २ अपक्ष असे एकूण ४१ मते होती. परंतु पवार यांनी इतर पक्षातील अतिरिक्त ६ मते मिळवून एकूण ४७ मते मिळवली. त्यातून ते राष्ट्रीय नेते आहेत. बारामतीमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झाली. मी उपस्थित होतो. भर पावसातही लोकांची गर्दी व प्रतिसाद बघता जनता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असल्याचा दावा केला.
दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, एआयएमआयएम आणि वंचित या दोन पक्षांना सोबत घेऊन तिसरी आघाडी तयार होत असल्याची चर्चा आहे. त्यावर धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, राज्यात महायुती भक्कम आहे. कालच्या सभेतही आमचे नेते अजित पवार यांनी त्याबाबत स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडूनच लढून २०० हून जास्त जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गडचिरोलीतील वडलापेठ येथे ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून सूरजागड इस्मात कंपनीचा कारखाना उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. १७) आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात असलेल्या या कारखान्यातून येत्या एक- दोन वर्षांत सुमारे ८ ते १० हजार तरुणांना रोजगार मिळेल. यासाठी आपण 250 एकर जमीन दान दिल्याचे सांगितले. या भागात मायनिंगशी संबंधित कामे सुरू झाल्यावर आतापर्यंत ४ ते पाच हजार जणांना रोजगार मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.