नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरामध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर सामुहिक अत्याचार केल्याची घटना 21 जुलै 2017 दिवशी घडली होती. या प्रकरणी 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला. अतुल उर्फ बाबा नरेश जनबंधू, फिरोज अहमद जमील अहमद, स्वप्नील देवानंद जवादे, मयूर रमेश बारसागडे, कृष्णा हरिदास डोंगरे, जितू उर्फ चन्नी रमेश मंगलानी आणि सचिन गोविने अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
नागपुरातील कटोल रोड येथील सरकारी निरीक्षण गृहामधून पिडीत अल्पवयीन मुलीला समोसा आणि खायला देण्याच्या अमिषाने तिचे अपहरण करण्यात आले होते. तसेच तिला अपहरण करुन नागपूर येथील व्हरायटी स्क्वेअरवर आणून दुसऱ्या व्यक्तीच्या हवाली केले. यानंतर आरोपी तिला जरीपटका भागातील एका फ्लॅटमध्ये घेवून गेले. तसेच त्या ठिकाणी पिडीतेवर दोन दिवस सामुहिक अत्याचार केला.
या प्रकरणी पीडितेने सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दोन दिवसांमध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक दीपाली राऊत यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये अतुल उर्फ बाबा नरेश जनबंधू, फिरोज अहमद जमील अहमद, स्वप्नील देवानंद जवादे, मयूर रमेश बारसागडे, कृष्णा हरिदास डोंगरे, जितू उर्फ चन्नी रमेश मंगलानी आणि सचिन गोविंदराव बावणे यांच्यावर आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा प्रत्येकी 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.