

Sangh BJP meeting Reshimbagh Chief Minister participate
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात आज (रविवार) सकाळपासून भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची वर्दळ पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत भाजपची ही समन्वय बैठक होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींसह विदर्भ नव्हे तर राज्यभरातून महत्त्वाचे नेते आल्याची माहिती आहे.
संघ परिवाराची समन्वय बैठक नागपुरातील रेशीमबाग डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात होत आहे. दिवसभर ही बैठक चालणार आहे. या बैठकीत विदर्भातील भाजपचे आमदार, मंत्री तसेच भाजपचे विदर्भातील मुख्य पदाधिकारी आणि संघाच्या विविध मुख्य संघटनांचे मुख्य पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीला विदर्भ स्तरावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भस्तरीय विविध 32 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. दीपक तामशेट्टीवर, राम हरकरे, अतुल मोघे यांच्यासह संघाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता विशेष महत्त्व असणार आहे.
दरवर्षी होणाऱ्या वार्षिक समन्वय बैठकीमध्ये मागील वर्षभरात झालेल्या कामाचा लेखाजोखा विविध संघटनांच्या मार्फत मांडला जातो. तसेच पुढील वर्षीच्या कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीतून केले जाते. सध्याच्या परिस्थितीत या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुका, संघाचा सहभाग पाहता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष हे सहभागी होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व आल्याचे म्हणता येईल.