

नागपूर ः हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्यानंतर विधान परिषदेचे कामकाज तासाभरात तहकूब झाले. कामकाज लवकर संपल्याने आजचा पहिला दिवस खऱ्या अर्थाने सभागृहाबाहेर भेटीगाठींचा ठरला.
कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तापलेल्या राजकीय वातावरणानंतर प्रथमच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांच्यातील भेट सभागृहाबाहेर चर्चेत आली. राजकारण निवडणुकीपुरतेच करायचे असते. आता आमचे संबंध पूर्वीसारखे चांगले आहेत असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे अनेक मान्यवरांनी विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना त्यांच्या दालनात भेट घेत शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, किरण सरनाईक, तसेच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि अभिजीत वंजारी यांनी सभापती व उपसभापतींशी संवाद साधत हिवाळी अधिवेशनासाठी शुभेच्छा दिल्या.