

मुंबई : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकमेकांच्या पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्यावरुन, फोडाफोडवरुन सध्या वाद सुरु आहे. त्यामुळे संघर्षही निर्माण झाला आहे. उलट सुटल विधानांमुळे कटुता येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपअजित पवार यांच्यात येत्या दोन दिवसांत एक महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत महायुतीतील पक्षांमध्ये सध्या सुरू असलेल्या सदस्य प्रवेशांवर आणि विशेषतः एकमेकांच्या पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यावर चर्चा केली जाईल. यापूर्वी महायुतीमध्ये असा अलिखित करार झाल्याचे बोलले जात होते की, मित्रपक्षांनी एकमेकांचे नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा प्रमुख पदाधिकारी यांना आपल्या पक्षात घेऊ नये. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही फोडाफोडी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले आहे. यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे.
संजय शिरसाट यांनीही नुकतेच रवींद्र चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाच्या भूमिकेवर भाष्य करत, आम्हालाही फोडाफोडी करावी लागेल असे म्हटले होते. यामुळे महायुती धर्माचे पालन करण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी बैठकीत आपापल्या पक्षांतील नेत्यांना फोडण्यावर बंदी घालण्याबाबत पुन्हा एकदा गांभीर्याने विचार केला जाईल. विरोधी पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यावर हरकत नसली तरी, मित्रपक्षांमधील नेत्यांची फोडाफोडी टाळणे महत्त्वाचे मानले जात आहे, जेणेकरून महायुतीला गालबोट लागू नये आणि कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करता यावी, यासाठी या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.