

Eknath Shinde Ravindra Chavan share stage
ठाणे : महायुतीमधील दोन घटक पक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप. या दोन पक्षांमध्ये काही दिवसांपासून अंतर्गत कलह सुरू आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वादाचे रूपांतर संघर्षात झाल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोन्ही नेते आज एकाच व्यासपीठावर आले. यावेळी दोघांनी एकमेकांशी चर्चाही केली. मात्र व्यासपीठावरून बोलताना विकास निधीबाबत दोघांनी वेगवेगळे दावे करत अप्रत्यक्षरित्या राजकीय संघर्ष कायम असल्याचेच सूतोवाच केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमानिमित्त एका व्यासपीठावर आले. यावेळी दोघांमध्ये चांगल्या गप्पाही रंगल्या. शिंदे आणि चव्हाण यांच्यामध्ये मंत्री उदय सामंत बसले होते. मात्र उदय सामंत हे उठले आणि त्यांनी रवींद्र चव्हाण यांना एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या खुर्चीवर बसण्यास जागा दिली.
यावेळी विकास निधीवरून शिंदे आणि चव्हाण यांच्यात चढाओढ देखील पाहावयास मिळाली. विकास कामांसाठी जेवढा निधी लागेल तेवढा दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावरून शिंदे आणि चव्हाण यांच्यातील अंतर्गत वाद हा सुरूच असल्याचे अप्रत्यक्ष रित्या स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटातील काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केली होती.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, "विकास कामांसाठी प्रस्ताव तयार करा. विकास कामांसाठी लागणारे पैसे देण्याचे काम मी स्वतः करीन. मी विकास कामांसाठी निधी देण्याचा शब्द तुम्हाला देतो. मी एकदा शब्द दिला की शब्द पाळतो," असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, या भागातील विकासासाठी काम करत राहिलो. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे मोठा निधी मला माझ्या मतदारसंघासाठी मिळाला. यासाठी मी शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो.
एमएमआरडीएचा निधी आम्हाला मिळतच नव्हता. त्यावेळी निधीसाठी न्यायालयात जावे लागले की काय, अशी अवस्था होती. परंतु विकास निधीबाबतचा बदल हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये २०१४ च्या नंतर काळात झाला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एमएमआरडीएचा निधी हा ठाणे महानगरपालिकेसाठी देण्याचे पाऊल उचलले गेले, असे चव्हाण यांनी सांगितले.