

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरसह विदर्भातील अन्य भागातून नोकरीसाठी पुण्यात आलेल्या नागरिकांना आता पुणे ते नागपूर अंतर लवकरच सहा तासात कापता येणार आहे. पुणे, अहमदनगर, संभाजीनगर या अतिशय वर्दळीच्या, वाहतुकीची कोंडी होणाऱ्या रस्त्यांचा कायापालट होऊन हा रस्ता थेट मुंबई -नागपूर समृद्धी एक्सप्रेस हायवेला जोडला जाणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर हे अंतर अगदी कमी होणार आहे.
याबाबत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज (दि.८) याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. एमएसआयडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या मार्फत हे काम केले जाणार असून ७००० कोटी रुपयांचा हा प्रकल्प साधारणतः लोकसभा निवडणुकीनंतर मार्गी लागणार आहे. एमओयू झाल्यामुळे आता तातडीने भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग द्यावा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिले. यावेळी एमएसआयडीसीचे प्रबंध संचालक ब्रजेश दीक्षित उपस्थित होते.
सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) राष्ट्रीय महामार्ग राज्य सरकारने आधुनिकीकरण केल्यास टोलच्या माध्यमातून किमान महिन्याला १०० कोटी उत्पन्न वाढेल, यासोबतच नव्या द्रुतगती सहा पदरी ग्रीन फिल्ड महामार्गाचे कामही मार्गी लागेल, याकडे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लक्ष वेधले.
नवीन ग्रीन फील्डचा विकास 6 -लेन एक्सप्रेसवे (२३० किमी) रस्ता बांधकाम संदर्भात आज महामार्ग मंत्रालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र यांच्यात सामंजस्य करारावर साक्षऱ्या करण्यात आल्या. विकसनशील भारताच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या जलद विकासावर यानिमित्ताने भर दिला जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावानुसार जलद अंमलबजावणीसाठी हे काम महाराष्ट्र सरकारची संस्था असलेल्या महाराष्ट्र इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे (MSIDC) सोपवण्यात आले आहे. पुणे, अहमदनगर, बीड, मराठवाड्याला एका बाजूने पुणे, बंगलोर व पुढे दक्षिण भारताशी जोडणाऱ्या महामार्ग-चेन्नई कॉरिडॉरलाही ते जोडले जाईल. आणि गुजरात राज्याला जोडेल. महाराष्ट्रातील आर्थिक विकासासाठी पर्यावरणपूरक महामार्ग विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. मनपाकडील कचरा, फ्लाय ॲश यासारख्या टाकाऊ वस्तूंचा रस्ते बांधकामात वापर केला जाणार आहे. यासाठी ३,७५२ हेक्टर जमीन आवश्यक असून हा एक्स्प्रेस वे पर्यावरणपूरक, नेट झिरो कार्बन आणि नेट पॉझिटिव्ह ऊर्जा प्रकल्प म्हणून बांधला जाणार आहे.
हेही वाचा :