

नागपूर- नितेश राणे किंवा इतर कुणी काय म्हटले त्याकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. मात्र काल मी जे बोललो ते तोडून मोडून दाखविण्यात आले. माझ्या बोलण्यामुळे या हल्ल्यातील मृतांचे कुटुंबीय कुणी दुखावले असतील तर मी माफी मागतो पण उगीच अर्धवट वाक्य दाखवित बदनामी नको असे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
भारताला आपापसात लढविण्याचे षड्यंत्र सुरू आहे. पहिल्यांदा दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. सरकारने आपले अपयश लपविण्यासाठी माझे वक्तव्य तोडामोड करून दाखविले. आमची भूमिका स्पष्ट आहे.अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जी भूमिका मांडली ती आमच्या पक्षाची भूमिका आहे.
काल मी असे बोललो की, दहशतवाद्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला, त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. नेमके तेवढेच दाखविण्यात आले. माझं पूर्ण वक्तव्य दाखवा.अतिरेक्यांना पाकिस्तानने शिकवून पाठविले. देशात यादवी व्हावी म्हणून धर्म विचारून मारण्यात आले. देशाच्या सार्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी असा कट रचला.
अतिरेक्याला कुठला धर्म हा भारताला कमजोर करण्याचा हल्ला होता. मुळात 26 वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवल्याचा आरोप केला.
सरकारमध्ये सर्वकाही ठीक नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येऊन गेले पण तोडगा निघाला नाही. तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. परस्पराविरोधात वक्तव्य केली जात आहेत. त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. केवळ सत्ता, खुर्चीसाठी भांडण सुरू आहेत.
शिक्षक भरती तपासात इडीचा प्रवेश झाल्याची बातमी मी वाचली. उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमून याची चौकशी व्हावी, केवळ एकाला अटक करून ही चौकशी होणार नाही. यात जे जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.
काँग्रेसचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला. पुढच्या काळात जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी असंवेदनशील आणि देशातील जनतेच्या भावना दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केले. अशा वक्तव्याला माफी मागून होणार नाही असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले. मीडियाचा स्पेस घेण्यासाठी बोलायचे, मात्र आपल्या बोलण्याने समाजात काय परिणाम होईल याचा विचार नाही. व्यक्तीने कितीही मोठ्या पदावर असले तरीही असंवेदनशील बोलू नये.