

BJP leader Bawankule criticizes Vijay Vadettiwar
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
दहशतवाद्यांना पांघरूण घालण्याचा प्रयत्न, देशभक्त जनतेच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा, या शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
बावनकुळे यांनी एक्सवरून काय म्हटलंय पाहुयात, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काश्मीरमध्ये हिंदूंना टार्गेट केलं जातं हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. मग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार कोणत्या जगात वावरत आहेत “दहशतवाद्याला जात-धर्म नसतो” असं म्हणून वडेट्टीवार कोणाला खूश करू पाहत आहेत?
काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का? विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे दहशतवाद्यांचा चेहरा झाकण्याचा, त्यांना संरक्षण देण्याचा किळसवाणा प्रयत्न दिसतो. हा केवळ बेजबाबदारपणा नाही, तर देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण आहे. देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाने वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करायला हवा. काँग्रेसचे नेते भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत, जखमांवर मीठ चोळत, राजकारण करत आहेत याकडे लक्ष वेधले.
काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी धर्म विचारून गोळ्या मारायला दहशतवाद्यांकडे वेळ होता का? असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका होउ लागली आहे. त्यातच काँग्रेसच्या वरीष्ठांनी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या भूमीकेहून वेगेळे काही मत मांडू नये. प्रतिक्रिया देउ नये असे सांगितले आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्याच्या घटनेवर काँग्रेस नेत्यांच्या येणाऱ्या विधानांची पक्षाच्या वरीष्ठांनीही दखल घेतल्याचे दिसून येत आहे.