

Political Clash
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात,समर्थकांत झालेल्या वाद प्रकरणी दोघांनाही नोटीस बजावण्यात आली असून 15 दिवसात उत्तर मागितले असल्याची माहिती विशेषाधिकार समितीचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. दुसरीकडे विधानभवनाच्या हक्क भंग समितीची उद्या बैठक होत असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनाही बोलवण्यात आले आहे.
अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाण याबद्दल अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली आहे. हे प्रकरण हक्क भंग समितीकडे सुपूर्द केले.मागच्या आठवड्यात आमच्या समितीकडे प्रकरण आले. यामध्ये दोन्ही आमदारांना त्यांचे काय म्हणणे आहे यासाठी त्यांना 15 दिवसात म्हणणे मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
काही लोकावर गुन्हे नोंदविण्यात आलेत. हा 288 आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने उद्या मुंबई पोलिस आयुक्ताना देखील बोलावले आहे. यातील काही लोकांवर क्रिमिनल केसेस आहेत अशी आम्हाला माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे तपासायची गरज आहे. हे सर्व हेतू परस्पर किंवा मोठा घातपात करण्याच्या उद्देशाने तर नव्हता याचाही तपास केला जाणार आहे.
हा दोघांमधील आपसातील वाद असल्यामुळे समिती त्यांना अगोदर संधी देत आहे. त्यांचे मत काय याविषयी निष्कर्ष काढण्यासाठी त्यांना फॉर्मलिटी म्हणून नोटीस दिली आहे. त्यानंतर त्यावर काय निर्णय घ्यायचे ते ठरविणार आहेत. दोन्ही आमदारांना पंधरा दिवसाची नोटीस दिल्याने ते उद्याच्या बैठकीत उपस्थित राहणार नाही असेही भांडेकर यांनी स्पष्ट केले.