

नागपूर : पॉसद्वारेच विक्री बंधनकारक असूनही काही कृषि निविष्ठा केंद्र चालक याचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्याने या कृषि केंद्राची तपासणी करण्यात आली. तालुका गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथका मार्फत तपासण्या करून २ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद आदेश बजावण्यात आले तर ८ कृषि सेवा केंद्राचे रासायनिक खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत.
नागपूर जिल्ह्यात 1495 कृषी सेवा केंद्र असून खरीप हंगामाच्या अनुषंगाने ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ४२,५४४ मे.टन युरियाचे आवंटन मंजूर असून ऑगस्ट सुरुवातीला ४८,८९६ मे टन युरियाचा ११४ टक्के पुरवठा झालेला आहे. यापैकी पॉस मशीनद्वारे ३६,९८६ मे टन इतका युरिया विक्री झालेला असून ११,९१० मे. टन इतका शिल्लक साठा दिसून येत आहे.
रासायनिक खताचे नागपूर जिल्ह्यात एकूण १४९५ परवानाधारक कृषी सेवा केंद्र असून या केंद्राची तपासणी त्या त्या तालुक्याकरीता नेमलेल्या पूर्ण वेळ गुण नियंत्रण निरीक्षकामार्फत सुरु आहे. या निरीक्षकांनी आतापर्यंत रासायनिक खताचे एकूण ११८ घेतलेले नमुने असून त्यापैकी १६ नमुने अप्रमाणित आढळून आले असून त्यांचेवर पोलीस कारवाई करून १२ कोर्ट केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यांचेकडून १.२० मे. टन साठा जप्त करण्यात आलेला असून त्याचे मूल्य रु. १.३५ लाख इतके आहे.
जिल्ह्यात युरियाची टंचाई होऊ नये म्हणून ३,५५० मे. टन इतका साठा संरक्षित करून ठेवण्याचे लक्षांक होते. त्यानुसार ३,४४५ मे टन युरिया संरक्षित करण्यात आला आणि दोन टप्प्यात संपूर्ण साठा मुक्त करण्यात आला असून तो कृषि सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. तसेच या आठवड्यात कृभको आणि एचयुएफएल या कंपन्यांची ३,८३० मे टन युरिया खताची रेक येत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी बंधूनी युरिया खताच्या उपलब्धतेबाबत चिंता करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.