

Nagpur Politics
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात या सततच्या पक्ष प्रवेशाची चर्चाही रंगते. मात्र यात शनिवारी नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा दुपट्टा घालून झालेला कुख्यात युवराज माथनकर यांचा शिवसेनेतील प्रवेश शिंदे सेनेसाठी अडचणीचा ठरला आहे. तिकडे कुणी राहिले असे वाटत नाही, अशी टीका त्यांनी काल या पक्ष प्रवेश सोहळ्यातून उबाठा गटावर केली होती. माजी खासदार प्रकाश जाधव समर्थक राजू तुमसरे आणि इतरही अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी वर्धा रोडवरील बँकवैट हॉल येथील कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश घेतला.
आता माध्यम, सोशल मीडियावर खून, खंडणी अशा अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असलेल्या माथनकर यांच्या या पक्ष प्रवेशाची चर्चा रंगल्यावर आता शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज गोजे यांनी रविवारी यासंदर्भात तडकाफडकी एक पत्र काढून माथनकर यांना पक्षात प्रवेश दिलाच नाही असे घूमजाव केले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या गर्दीत कदाचित त्यांचा पक्षप्रवेश झाला असावा, दुपट्टा गळ्यात घातला असावा अशी कबूलीही त्यांनी दिली.
मात्र पक्षाला हानी पोहोचेल अशा कुठल्याही व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊ नका असे स्पष्ट निर्देश भाईंनी दिले असल्याचे सांगत आता शिवसेनेच्या वतीने माथनकर यांचा काल प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत समावेश नव्हता असा सावध पवित्रा घेण्यात आला आहे.