'ऑपरेशन टायगर': शिवसेनेचा विदर्भावर फोकस; एकनाथ शिंदे गुरूवारी दौऱ्यावर

Eknath Shinde | राज्यव्यापी आभार दौरा
Deputy CM Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. File Photo
Published on
Updated on
राजेंद्र उट्टलवार

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे भक्कम सरकार सत्तेत आल्यानंतर पक्ष संघटन वाढीसाठी शिवसेना पक्ष नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २० फेब्रुवारी रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर त्यांचा हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यव्यापी आभार दौरा स्वबळाच्या चाचपणी दृष्टीने चर्चेत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केल्याने ही शक्यता अधिक वाढली आहे. शिंदेंच्या विदर्भ दौऱ्याची सुरुवात महायुतीने गमावलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून होणार आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या सर्व आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्या या आभार सभा होणार असून पक्ष संघटन मजबुतीचा प्रयत्न केला जात आहे. राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल हे रामटेकमध्ये पाचव्यांदा विजयी झालेले आहेत. सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, कॉमन मॅन अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक ठेवला, असा दावा करताना पक्षाच्या सर्व विधानसभा मतदारसंघात ते जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री आशिष जैसवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

दर आठवड्यात दोन सभा शिंदे घेणार आहेत. या माध्यमातून त्यांनी विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. आमचा संघटन बांधणीवर भर असल्याची माहिती आमदार कृपाल तुमाने यांनी दिली. विदर्भात मोठ्या प्रमाणात माजी आमदार व अन्य पदाधिकारी शिवसेनेत प्रवेशासाठी उत्सुक आहेत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. महायुती भक्कम असून महाआघाडीत बिघाडी झाल्याचा आरोप करण्यात आला.

दरम्यान, संपर्क मंत्री नियुक्त केले जाण्याबाबत भाजपवर बोलणे त्यांनी टाळले. प्रत्येक पक्षाला विस्ताराचा अधिकार आहे. सर्व पक्ष मजबूत झाल्यास महायुती अधिक भक्कम होईल आणि स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा आमचा विचार आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार विचार केला जाईल, असेही यावेळेस स्पष्ट करण्यात आले. पक्षाने 24 जानेवारीपासून शिवकार्य सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असून डिजिटली सदस्य नोंदविले जात आहेत. या दौऱ्यासाठी संपर्कप्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार व इतर पदाधिकारी कामाला लागले आहेत.

Deputy CM Eknath Shinde
नागपूर : फटाके कंपनीतील स्फोटप्रकरणी व्यवस्थापकाला अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news