

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काटोल तालुक्यातील कोतवाल बर्डी येथील एशियन फायर वर्क्स अँड एक्सप्लेसिव्ह कंपनीतील स्फोटात दोन कामगार मृत्यू प्रकरणात कलमेश्वर पोलिसांनी निष्काळजीपणासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून व्यवस्थापक मुस्तफा सैफुद्दीन शेगाववाला यांना अटक केली आहे. ही कंपनी नागपुरातील सदर येथे राहणारे सुहेल अमिन यांच्या मालकीचीआहे. (Nagpur News)
या स्फोटानंतर पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख तर जखमींना पाच लाख रुपये देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला दिले.
रविवारी दोनच्या सुमारास या कंपनीच्या ब्लोअरमध्ये बुरुड कोळसा पावडर गरम करण्यात येत असताना अचानक एकामागून एक तीन स्फोट झाले होते. यात मुनिश मडावी (वय 34, रा. मंडला, मध्य प्रदेश) आणि भुरा लक्ष्मण रजाक (वय 25, रा. शिवनी, मध्य प्रदेश) या कामगारांचा मृत्यू झाला. याशिवाय सौरभ सुरेश मुसळे (रा. डोरली, भिंगारे ता. काटोल), घनश्याम लोखंडे व सोहेल शेख (दोघे रा. राहुलगाव, ता. काटोल) असे तीन कामगार जखमी झाले. सुदैवाने इतर महिला व पुरुष कामगार डबा खाण्यासाठी बाहेर पडल्याने बचावले. एका झाडाखाली ते बसून जेवतानाच हा भीषण स्फोट झाला.