

OBC Agitation Constitution Chowk
नागपूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईमधील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या ओबीसी महासंघाने देखील आता आक्रमक पवित्रा स्वीकारण्याचे ठरविले आहे.
उद्या शुक्रवारी संविधान चौकात धरणे आंदोलन, साखळी उपोषण केले जाणार आहे. ओबीसी समाजातर्फे ३० ॲागस्टपासून संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले जाईल अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी केली आहे. एकीकडे ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलकांनी मुंबईत मोर्चाची हाक दिली आहे तर दुसरीकडे ओबीसी महासंघाने या संदर्भात पुढील रणनीती ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली.
जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केल्यावरून भाजप नेत्यांनी जरांगे यांचा तीव्र निषेध केला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा ओबीसी वादाकडे, तापलेल्या वातावरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
आता हा लढा मागे हटणार नाही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून दुसऱ्या कोणत्याही समाजाला आरक्षण देऊ नये अशी ओबीसी महासंघांची मागणी आहे. हा निर्णय गुरुवारी ओबीसी महासंघाच्या नागपूर येथील महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. ओबीसींच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, यासाठी आता राज्यव्यापी लढा उभारला जाणार आहे, असे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आंदोलनाची घोषणा करताना स्पष्ट केले. महासंघाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन नागपूरमधील या आंदोलनाबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुंबईकडे कधी मोर्चा वळवायचा, याचा अंतिम निर्णय नागपूरमधील साखळी उपोषण संपल्यानंतर घेण्यात येईल असेही तायवाडे म्हणाले.