

नागपूर: तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावाने देशातील पहिले 'स्मार्ट आणि इंटेलिजेंट' गाव होण्याचा मान मिळवला आहे. आरोग्य, शिक्षण, शेती आणि बँकिंग यांसारख्या १८ हून अधिक सेवा एकाच छताखाली आणणारा हा प्रकल्प म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल असून, तो देशातील इतर गावांना विकासाची नवी दिशा दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केला.
काय आहे 'स्मार्ट व्हिलेज' संकल्पना?
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'भारतनेट' या दूरदृष्टी प्रकल्पातून देशातील गावांना डिजिटल युगाशी जोडण्याची पायाभरणी झाली. राज्यात 'महानेट'च्या माध्यमातून याला अधिक गती मिळाली. आता याच प्रवासात एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत, भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या सहकार्याने 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेने सातनवरी गावात हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. या अंतर्गत गावकऱ्यांना खालील प्रमुख सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्मार्ट शेती: ड्रोनद्वारे कीटकनाशक व खत फवारणी, सेन्सर आधारित माती परीक्षण आणि स्मार्ट सिंचन
स्मार्ट आरोग्य: टेलिमेडिसिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
स्मार्ट शिक्षण: प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल साधनांचा वापर
इतर सुविधा: 'बँक ऑन व्हील' (फिरती बँक सेवा), स्मार्ट टेहळणी (सुरक्षेसाठी कॅमेरे) आणि इतर अनेक डिजिटल सेवा.
गावकऱ्यांच्या जीवनात काय बदल होणार?
या प्रकल्पामुळे गावाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, "ड्रोन आणि सेन्सर तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अचूक नियोजन करून शेतीचा उत्पादन खर्च कमी करता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारल्याने आणि गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने गावकऱ्यांचे जीवनमान उंचावेल." शिक्षणाबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, ‘प्राथमिक शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाल्याने येथील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळेल. यामुळे सातनवरी गाव लवकरच देशासाठी एक 'रोल मॉडेल' म्हणून नावारूपाला येईल’
देशातील सर्वात प्रगतीशील गाव बनण्याचे ध्येय
यावेळी मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि या आधुनिक सेवांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. येत्या वर्षात सातनवरी गावाने देशातील सर्वात प्रगतीशील गाव म्हणून नावलौकिक मिळवावा, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.