

नागपूर: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित तिरंगा रॅलीत उत्साहाच्या भरात हेल्मेट घालण्यास विसरणे भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांना चांगलेच महागात पडले आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी त्यांना थेट २५०० रुपयांचे ई-चलन पाठवून कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
नेमके काय घडले?
सावनेर विधानसभा मतदारसंघात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एका 'देशभक्तीपर बाईक रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आमदार देशमुख स्वतः बुलेट चालवत सहभागी झाले होते. मात्र, यावेळी त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यांच्यासोबत रॅलीत सहभागी झालेले इतर अनेक कार्यकर्तेही विनाहेल्मेट प्रवास करत होते.
आमदार देशमुखांवर कारवाई झाल्यानंतर आता एक नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रॅलीतील इतर अनेक कार्यकर्तेही विनाहेल्मेट दुचाकी चालवताना दिसत आहेत. त्यामुळे, कायदा केवळ आमदारांपुरता मर्यादित आहे की या रॅलीतील सर्वच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाईमुळे 'लोकप्रतिनिधींसाठी एक आणि सामान्यांसाठी दुसरा कायदा' ही भावना मोडीत निघणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.