

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्याने नागपूरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा संदर्भ देत, सुशिक्षित आणि उच्चभ्रू परिसराच्या तुलनेत गुन्हेगारी व रेड-लाइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातून आपल्याला अधिक मतदान मिळाल्याचा दावा केला. उच्चभ्रू भागात सुमारे ७० ते ७५ टक्के मतदान झाले, तर काही गुन्हेगारी व रेड-लाइट भागात तब्बल ९२ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मतदानाच्या या आकडेवारीचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट करत त्यांनी लगेचच आपली भूमिका मांडली. संबंधित परिसरातील व्यक्तींशी आपले कोणतेही वैयक्तिक संबंध नसल्याचे सांगतानाच, कोणत्याही बेकायदेशीर कारवायांना आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामांमुळे विश्वास वाढल्याचा दावा
गडकरी यांनी संबंधित भागांमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असल्याचे सांगितले. रस्ते, मूलभूत सुविधा आणि समाजोपयोगी कामांवर भर दिल्यामुळे तेथील नागरिकांचा आपल्यावरील विश्वास वाढला. त्याचे प्रतिबिंब निवडणुकीतील मतदानातून दिसून आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरींच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा
नितीन गडकरी हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या भाषणातील वक्तव्यांना अनेकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व मिळते. यापूर्वीही सार्वजनिक जीवनातील आपल्या तीन दशकांच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी नव्या पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत चर्चांना उधाण आले होते.
मात्र, त्यावेळी गडकरी यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. संबंधित वक्तव्य राजकारणातून निवृत्ती घेण्याबाबत नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भात असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आता गुन्हेगारी आणि रेड-लाइट भागातील मतदानाबाबत केलेल्या ताज्या दाव्यामुळे गडकरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.