

पुणे: शेतकरी श्रीमंत झाला तरच आपला देश श्रीमंत होईल. त्यासाठी धान्यापासून जैवइंधनाची निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रोजन, इथेनॉल, जैविक डांबर, आयसोबिटेनॉल असे इंधन लवकरच शेतकरी करू लागेल, तेव्हाच आपला देश जगातील तिसरी महासत्ता होईल, असे मत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
येथील प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने जागतिक जैवइंधन दिनाच्या निमीत्ताने एका विषेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी आले होते. या वेळी व्यासपीठावर प्राज इंडस्ट्रीचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष तथा किलोस्कर कंपनीचे प्रमुख संजय किर्लोस्कर यांची उपस्थिती होती. (Latest Pune News)
या वेळी डॉ. चौधरी यांच्या इंग्रजी जीवनचरित्राचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. खास जैव इंधनावर आधारित विषयावर या ठिकाणी चिंतन झाले. सुरुवातीला डॉ. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर किर्लोस्कर यांनी आपले विचार मांडले.
आता गरिबांच्या पैशातून रस्ते बांधणार..
ते म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय)आता बॉन्ड 8.5 ट्कके दराने बाजारात आणणार आहे. सामान्य नागरिकांनी हे विकत घेतले तर त्या पैशातून मी आता रस्ते बांधणार आहे. टोलवसुली आता 45 हजार कोटींवर गेली आहे, ती लवकरच सवा लाख कोटींवर जाईल. त्याचाही फायदा विकास कामे करण्यात मोठा होत आहे.
...तर शेतकरी श्रीमंत होईल
गडकरी यांनी भाषणात शेतकरी केंद्रबिंदू ठेवत विचार प्रकट केले.ते म्हणाले, आपल्या देशात 40 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते.आपण 22 लाख कोटींचे जैवइंधन आयात करतो.मात्र तेच इंधन आपला शेतकरी धान्यापासून तयार करू शकतो. त्यासाठी आम्ही मक्यापासून इथेनॉल तयार केले.जो मका 1200 रुपये क्विंटल होता.त्याचा भाव आता शेतकर्याला 2600 रुपये क्विंटल मिळू लागला आहे.अशा प्रकारे शेतकरी इंधन, वीज तयार करू लागला तर त्याच्या खिशात भरपूर पैसा येईल आणि तो श्रीमंत होईल.
शेतकरी वीज अन् विमानाचे इंधन तयार करेल..
गडकरी म्हणाले, मी विदर्भात राहतो त्या भागात आजवर दहा हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या ते पाहून मन कळवळले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून मी शेतकर्यांना उद्योगाच्या प्रवाहात कसे आणता येईल हेच पाहतो आहे.त्यांना धान्यापासून हरित इंधन करण्यास शिकवले तर मोठी क्रांती होईल अन् ती आता होत आहे. एक दिवस शेतकरी वीजनिमिर्र्तीसह विमानाचे इंधन तयार करेल तो सुदिन असेल.