

Chandrashekhar Bawankule on Nana Patole
नागपूर: मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले असून ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही, तर पाक दहशतवाद्यांवर केलेली धाडसी कारवाई आहे. शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या मोहिमेची हेटाळणी म्हणजे संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. देशाच्या शौर्याचा उपहास, सर्जिकल स्ट्राइकवर संशय, यानिमित्ताने काँग्रेसची नीच मानसिकता पुन्हा उघड झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून केला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम आहे’ असे संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केल्याने ते संतापले. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे.
ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे! देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि ‘भारत माते’च्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात. ‘सर्जिकल स्ट्राइक’चाही पुरावा मागण्याची नीच मानसिकता काँग्रेसने दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे, आणि कोण पाकिस्तानच्या! नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचा मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे. मी तुमच्या नीच मानसिकतेचा कडाडून निषेध करतो, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.