

नागपूर - भारतीय सैन्याच्या शौर्याने जगभरात गाजलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या सैन्याने शत्रूच्या घरात घुसून दहशतवादी अड्डे मोडून काढले. पाकिस्तानचे नापाक हल्ले आकाशातच उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम येथील दुर्देवी घटनेनंतर दिलेला इशारा खरा ठरला. यापुढे यापेक्षा जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल या शब्दात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरंगा यात्रेतील उपस्थितांमध्ये जोश भरला. सून ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्थान..! अशी घोषणाबाजी करीत उपस्थितानीही उत्स्फूर्तपणे दाद दिली.
या युद्धात भारताचे जे जवान शहीद झाले. देश या शहीदांचा कायमचा ऋणी राहील अशी भावना व्यक्त केली. भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भाजपातर्फे आज रविवारी सकाळी सावनेर, खापरखेडा येथे ग्रामीणमध्ये तर नंतर शहरात शहीद चौक ते बडकस चौक दरम्यान सिंदूर सन्मान, तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. मोठ्या संख्येने माजी सैनिक, वीरमाता, भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते,देशभक्त नागरिक हाती तिरंगा ध्वज घेत सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके, संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि अनेक सामाजिक आणि व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजप महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी,माजी अध्यक्ष बंटी कुकडे यांनी संयोजन केले.