पंचवटी (नाशिक) : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ भाजपतर्फे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरात शुक्रवारी (दि.१६) काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भर पावसात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीद्वारे देशभक्तीचे अनोखे दर्शन घडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले. या यशस्वी मोहिमेनंतर देशभरात सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी गोदावरी नदीच्या काठावर उपस्थित मान्यवरांनी गोदामातेची आरती करून देशाच्या सार्वभौमतेसाठी प्रार्थना केली. पंचवटी कारंजा येथून रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलमार्गे हुतात्मा स्मारक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान, 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'जय जवान, जय किसान' अशा देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. देशभक्तीपर गीतांचेही यावेळी सादरीकरण झाले.
रॅलीदरम्यान पाऊसही सुरू झाला. भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्या साहसाचे कौतुक करण्यासाठी या तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या नाशिककरांनी पाऊस अंगावर झेलत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाला सलाम केला. अनेकांनी तिरंगा अंगावर परिधान केला होता, तर काहींनी फेटे बांधून सहभाग घेतला होता. रॅली दरम्यान, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या रॅलीत माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आ. अॅड. राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीच्या समारोपस्थळी हुतात्मा स्मारकाजवळ नेत्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, भारतीय सैन्य दलाचे मनोबल उंचावण्यासाठी आणि त्यांच्या साहसाचे कौतुक करण्यासाठी ही तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे. भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्यामुळे संपूर्ण देशाला अभिमान वाटतो आहे. नाशिककरांनी या तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रप्रेमाची जाणीव अधोरेखित केली आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो.