

नागपूर : नागपूर विभागातील बहुचर्चित बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक नियुक्ती प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार व चिंतामण वंजारी आणि महत्त्वपूर्ण सहभाग असलेले लक्ष्मण मंघाम या तिघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडी अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.
एसआयटीने या तिघांची कसून चौकशी केली असता घोटाळ्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती, कागदपत्रे त्यांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारावर पोलीस पुढे तपास करणार आहेत. सेवानिवृत्त व संचालक सतीश मेंढे यांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचे पुढे आले असून पोलीस आता त्यांच्या मागावर आहेत.अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष तपास पथकाचे एक पथक भंडारा जिल्ह्यात तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिक्षण मंडळ सचिव वैशाली जामदार यांना छत्रपती संभाजी नगर येथून ताब्यात घेण्यात आले होते.